रब्बी डिजिटल शेती शाळा
मे २०२२ पासून, पानी फाउंडेशन दररोज डिजिटल शेती शाळेचे आयोजन करत आले आहे. शेतकऱ्यांना देशातल्या आघाडीच्या कृषी शास्त्रज्ञांशी थेट जोडून देत, शेतीच्या सर्वोत्तम पद्धती त्यांच्यापर्यंत अगदी विनामूल्य पोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आमचे नॉलेज पार्टनर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या संस्थेने ५० कृषी शास्त्रज्ञांची टीम या शाळेसाठी सज्ज केली आहे. राहुरी, परभणी, अकोला येथील तज्ञ, शेतकऱ्यांशी दररोज झूम द्वारे संवाद साधत अगदी पूर्व मशागत, कापणी, साठवण ते थेट मार्केटिंग या विषयांवर चर्चा घडवून आणत आहेत. हजारो शेतकऱ्यांचा यातून फायदा झाला आहे. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची मोठी बचत झाली आहे.
खरिप हंगाम जरी संपत आला असला तरी ज्ञानाचा हा प्रवाह काही आटणार नाहीय!
रब्बी हंगामातील पिकांसाठी होणाऱ्या शेती शाळेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
ही रब्बी डिजिटल शेती शाळा पानी फाउंडेशनने आयोजित केलेल्या कुठल्याही स्पर्धेचा भाग नाहीय. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही शाळा खुली आहे. ज्ञान मिळवून, उत्पादन आणि नफा वाढवणे हेच या शाळेचे उद्दिष्ट आहे. यात अट मात्र एकच आहे की गटाच्या रुपात एकत्र येऊन गटाची नोंदणी शेतकऱ्यांनी करायला हवी.